बाराबंकी - उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात बँक क्लर्कनं मागील काही वर्षात बेनामी संपत्ती जमावल्याने सीबीआयनं त्याच्यावर फास टाकला. नोटबंदीवेळी बँक कर्मचाऱ्याने ही संपत्ती गोळा केली असून किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडून लाखो रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर सीबीआयच्या एंटी करप्शन टीमनं यूनियन बँक ऑफ इंडिया फतेहपूर शाखेतील क्लर्क सुरेंद्र उर्फ मुन्ना शुक्ला यांच्यासह फिल्ड मॅनेजरला चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.
फतेहपूर येथील यूनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत अनेक गाड्या उतरलेले सीबीआयचे अधिकारी यांनी अचानक धाड मारली. गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास सीबीआयच्या टीमने बँकेत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर निर्बंध आणले. टीम अधिकारी जितेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात टीमने बँक कर्मचारी सुरेंद्र उर्फ मुन्ना शुक्लाची चौकशी केली. बतनेरा येथील रहिवासी राजेंद्र गुप्ता यांनी किसान क्रेडिट कार्डच्या नावाखाली १४ फेब्रुवारीला लाखो रुपये हडपल्याची तक्रार दिली होती.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बँक कर्मचारी सुरेंद्र शुक्ला याच्या घरी, लखनौ आणि अन्य ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. चौकशीवेळी बनावट कर्ज, किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी सुरेंद्र शुक्लाने बेनामी संपत्ती जमा केल्याचं समोर आले. सध्या मिळालेल्या कागदपत्रानुसार फिल्ड मॅनेजर विजय गुप्ता आणि मुन्ना शुक्ला या दोघांना अटक करून सीबीआयच्या कार्यालयात नेले आहे.
माहितीनुसार, सुरेंद्र उर्फ मुन्ना शुक्ला फतेहपूरच्या यूनियन बँकेच्या शाखेत २०१५ पासून जनरेटर ऑपरेटर म्हणून कामाला लागला. त्यानंतर तो बँकेच्या अधिकाऱ्यांशी जवळीक साधत थेट कंत्राटी बँक कामगार म्हणून कामाला लागला. मुन्ना बँकेत किसान क्रेडिट कार्ड बनवण्याचं काम करत होता. पूरग्रस्त भागात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने बनावट किसान क्रेडिट कार्ड बनवून त्याने लाखो रुपये लाटले. बँकेत अशी व्यवस्था केली ज्याने कुठलीही कर्जाची फाईल त्याच्या सहीशिवाय पुढे जात नव्हती. कर्जासाठी ग्राहक मुन्ना शुक्लाच्या संपर्कात आले. त्यातून मुन्नाने कोट्यवधीची कमाई केली. या पैशातून मुन्ना शुक्लाने बेनामी संपत्ती गोळा केली. त्यात स्वत:च्या गावात कित्येक एकर जमीन खरेदी केली. गावांत इटर कॉलेजही बनवले. त्याचसोबत फतेहपूर इथं घर बांधले. लखनौ इथं बंगला बांधून तो लग्झरी जीवन जगत होता.