नवी दिल्ली : सोन्याच्या दरात या आठवड्यात 1000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे संक्रांतीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीही केली जाईल. सरकारने सोन्याच्या दागिन्यांमधील फसवणूक टाळण्य़ासाठी कडक कायदा केला आहे. सोनारांनी हॉलमार्क नसलेले दागिने विकल्यास त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. तसेच जबर दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 15 जानेवारीपासून सोनारांना बीआयएस हॉलमार्कचे दागिने विकण्याचे बंधनकारक केले आहे. यासाठी सोनारांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. पुढील वर्षी 15 जानेवारीपासून सोनार केवळ 14, 18 आणि 22 कॅरेटचे हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार आहेत.
भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये नोंदणी करण्यासाठी आणि हॉलमार्कसाठी विक्रेत्यांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना 1६ जानेवारीला काढण्यात येणार आहे. यामध्ये 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्कचेच दागिने विकण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. बीआयएस एप्रिल 2000 पासून हॉलमार्कची योजना राबवत आहे. सध्या बाजारात जवळपास 40 टक्केच दागिने हॉलमार्क असलेले विकले जात आहेत.
पासवान यांनी सांगितले की, हा नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे. सध्या हॉलमार्किंग दहा प्रकारात दिले जाते. मात्र, पुढील वर्षीपासून केवळ तीन श्रेणींमध्ये 14, 18, 22 कॅरेट अशा तीन ग्रेडमध्येच विकण्यात येईल. देशभरात 234 जिल्ह्यांमध्ये 892 हॉलमार्क केंद्रे आहेत. तर 28849 सोनारांनी बीआयएस नोंदणी केलेली आहे.