वाळूज महानगर : प्रियकराने वाऱ्यावर सोडल्यानंतर परप्रांतीय तरुणीला सुखरूपपणे पोलिसांच्या स्वाधीन करणारा उद्योगनगरीतीस रिक्षाचालक चक्क मोबाइल चोरटा निघाल्यामुळे पोलीसही अवाक झाले. चांगले काम केल्यानंतर सत्कार करणाऱ्या पोलिसांनी गुन्ह्यात सापडल्यानंतर त्यास बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी सांगितले की, वाळूज एमआयडीसीत आठवडाभरापूर्वी विश्वास वंजारे या लघु उद्योजकांचा महागडा मोबाईल चोरट्याने खिशात हात घालून पळविला होता. वंजारे यांनी त्या चोरट्याचा पाठलागही केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. लांबविलेला मोबाईल आरोपीने बंदच ठेवल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी बातमीदाराच्या मदतीने संशयित अशोक बबनराव पानखेडे (१९ रा.रांजणगाव) या अॅपेरिक्षा चालकास शनिवारी (दि.५) ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने विश्वास वंजारे यांचा २७ हजाराचा मोबाईल लांबविल्याची कबुली देत मोबाईल पोलिसांना काढून दिला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन ओगले, पोहेकॉ. विजय होनवडतकर, कय्युम पठाण, पोना फकीरचंद फडे, पोकॉ. प्रदिप कुटे यांनी पार पाडली.
मी तुम्हाला मदत केलीय...
विशेष म्हणजे मोबाइल लांबविणाऱ्या रिक्षाचालक अशोक पानखेडे याने दोन महिन्यांपूर्वीच प्रियकराने वाऱ्यावर सोडलेल्या एका परप्रांतीय तरुणीस मदत करीत एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्याचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करीत शाबासकी दिली होती. आता चोरीत पकडला गेल्यानंतर त्याने मी पूर्वी पोलिसांची मदत केली, आता मला सोडा असा गयावया करू लागला.