पिंपरी : दुबई येथे पाठवण्यासाठी रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातील पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ६.४२० टन वजनाचे सुमारे सहा कोटी ४० लाख रुपयांचे रक्तचंदन, ट्रक यासह सहा कोटी ५२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नीलेश विलास ढेरंगे (वय ३५, रा. पिंपळगाव देपा, संगमनेर, अहमदनगर), एम. एक. सलीम (वय ४३, रा. सागर, जि. शिमोगा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय ४५, रा. कळंबोली, नवी मुंबई), झाकीरहुसेन अब्दुलरेहमान शेख (वय ५०, रा. चिता गेट, ट्राम्वे, मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय ३६, रा. कळंबोली, नवी मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे कर्मचारी वंदू गिरे व राजेंद्र काळे हे १२ मे रोजी रात्र गस्त घालत होते. त्यावेळी ताथवडे येथे एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वाहनातील पाचपैकी दोन जण पळून गेले. तर तीन जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता रक्तचंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसले. सदरचे रक्तचंदन चोरीचे असून ताथवडे येथे मोकळ्या जागेत ट्रक आहे, असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ट्रकसह रक्तचंदन जप्त केले.
ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून कर्नाटक येथून मुंबई येथे घेऊन जात होते. तेथून दुबई येथे ते रक्तचंदन पाठवण्यात येणार होते. एक टन रक्तचंदनाला एक कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यानुसार ६.४२० टन वजनाचे २०७ नग रक्तचंदनाचे ओंडके, एक ट्रक, चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन, असा एकूण सहा कोटी ५२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी वंदू गिरे, राजेंद्र काळे, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, अतिश जाधव, प्रशांत गिलबिले, बिभिषण कन्हेरकर, विजय गंभीरे विक्रम कुदळ बापूसाहेब धुमाळ तात्या शिंदे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सचिन नरुटे, श्याम बाबा, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.