लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीजीएसटी विभागाकडून कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असून, गेल्या २४ तासांत सीजीएसटीच्या मुंबईच्या पश्चिम आणि मध्य आयुक्तालयाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत १४० कोटींची बनावट बिले देणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये, २५ कोटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) उघडकीस आली आहे.
सीजीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम क्षेत्राने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट टोळीच्या फसवणुकीचे प्रकार उघड करत वर्सोवा येथील एका कंपनीच्या मालकाला अटक केली. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना, लोहयुक्त धातू (फेरस मेटल) आणि भंगाराचा व्यापार करणाऱ्या मेसर्स एनईसीआयएल मेटल डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. चौकशीत, मालाची खरेदी-विक्री किंवा पुरवठा न करता १० कोटी रुपयांची जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) फसवणूक केल्याचे दिसून आले. यामध्ये, कर फसवणुकीसाठी सुमारे ६० कोटींची बनावट बिले जारी करण्यात आली होती. या कंपनीच्या एका संचालकाला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र दुसरा संचालक फरार असल्याने त्याचा शोध सुरू होता. अखेर ११ मे रोजी त्याला शोधण्यात यंत्रणेला यश आले. संचालकांकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
४६५ काेटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटमुंबई पश्चिम आयुक्तालयाने ४६५ कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट उघडकीस आणले आहे. ३५ कोटी रुपये वसूल केले असून गेल्या सहा महिन्यांत करचोरी करणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले आहे. त्यापाठोपाठ सीजीएसटीच्या मुंबई मध्य अधिकाऱ्यांनी ८३ कोटींच्या बनावट बिलासह १५ कोटींची बनावट आयटीसी रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी आशिक स्टील इंडस्ट्रीच्या मालकाला बेड्या ठोकल्या असून, २४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.