कल्याण: येथील महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध लावत ते संबंधित नागरीकांकडे सुपूर्द करण्याची कामगिरी कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या पथकाने केली.
कल्याण रेल्वे स्थानक याठिकाणी बाहेर जिल्हयातून येणा-यांचे 2018, 2019 आणि 2020 या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी संबंधीत स्थानिक पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याच्या तक्रारी नोंदविल्या होत्या. या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत एकुण 44 मोबाईल तक्रारदारांना सोमवारी परत देण्यात आले आहेत. आपले हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. ओतूर येथील उषा तांबे यांचा 2019 मध्ये कल्याण पश्चिमेतील रामबाग येथून मोबाईल गहाळ झाला होता. त्यांना देखील आपला मोबाईल मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान रेल्वे स्थानक परिसर, गर्दीच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल अथवा इतर वस्तू चोरी होतात अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली असून चोरीच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माने पाटील यांनी यावेळी दिली.