इंद्रपाल कटकवार
भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील एका महिलेवर गोरेगाव व त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील कान्हळमोह येथे अमानुष अत्याचार करण्यात आला. या घटनेची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. या पाशवी कृत्याचा आम्ही निषेध करत असून या घटनेमागील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली.
रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिसांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर भंडारा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेर्पुंजे यांच्यासह महिला मोर्चातील भंडारा, गोंदिया व नागपूर येथील महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सुनील मेंढे म्हणाले, ३० जुलै व २ ऑगस्ट यादरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व भंडारा जिल्ह्यातील कान्हळमोह येथे या महिलावर पाशवी अत्याचार करण्यात आला. पिढीत महिलेल्या एवढ्या गंभीर जखमा असल्याने भंडारा येथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने तिला नागपूर येथे नेल्याशिवाय पर्याय नव्हता.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याशी संपर्क साधून महिलेला सर्वतोपरी मदत करण्याची मागणी केली. पवार यांनी मदत करण्याचे आश्वासने दिले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची कुठे हयगय झाली असेल तर त्याचाही बारकाईने तपास करावा, अशी मागणीही खासदार मेंढे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी एसआयटी नेमली असून समितीच्या प्रमुखपदी सक्षम आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करा
घडलेली घटना दिल्लीतील निर्भया प्रकरणाला उजाळा देत आहे. पुन्हा एका निर्भयाला त्वरित न्याय मिळावा ही जनतेची अपेक्षा आहे. परिणामी यातील आरोपींना पकडून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालावा व यासाठी ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. जंगलात गंभीर अवस्थेत पहाटे सापडलेल्या महिलेची माहिती तेथील रहिवासी सचिन बोरकर यांनी कारधा पोलीस ठाण्याला दिली. पिढीत महिलेला वेळीच उपचार मिळण्यासाठी त्यांचे कार्य एखाद्या देवदुतासारखे आहे. त्यांनी दाखविलेल्या तत्परतामुळेच ही घटना उघडकिला आल्याचेही खा.मेंढे म्हणाले.