नवी दिल्ली - देशभरात हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये हनुमान जयंतीच्या सणाला गालबोट लावणारी एक भयंकर घटना घडली. हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यातून दोन गटात संघर्ष झाला. पण सुदैवाने घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये 15 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा गावात ही घटना घडली. होलागुंडा गावात शनिवारी रात्री हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक जेव्हा गावातील एका मशिदीजवळ आली तेव्हा रमजानचा विचार करुन मिरवणूक आयोजकांनी मिरवणुकीतील माईक बंद केले होते. पण काही भक्तांनी 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी केली. त्यातून नाराज होऊन काही नागरिकांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिकांनीदेखील दगडफेक सुरू केली. या घटनेत जवळपास 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकार घडत असताना पोलिसांची भूमिका प्रचंड महत्त्वाची ठरली. पोलीस दोन्ही पक्षातील नागरिकांची समजूत काढू लागले. तसेच त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन गेले. मात्र पोलीस ठाण्यातही दोन्ही पक्षातील नागरिकांमध्ये तणावजन्य परिस्थिती होती. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाच्या तरुणांना दम दिला तेव्हा ते शांत बसले. संबंधित घटनेनंतर कुरनूलचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी होलागुंडा गावात पोहोचले. गावात कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळे सध्या गावातील वातावरण आता पूर्वपदावर आलं आहे. याच दरम्यान, भाजपाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. "हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई व्हावी" असं वीरराजू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.