खामगाव : कोरोना काळात वैधव्य आलेल्या सुनेला तिच्या पतीच्या नावे असलेली शेत जमीन पेरण्यासाठी एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. तिच्या अंगावर राख फेकत काळी जादू करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी न्याय न दिल्यामुळे न्यायालयीन प्रकीयेतून पिडीतेने पोलीसांना गुन्हा दाखल करण्यास बाध्य केले.
याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील तालुला देऊळगाव माहेर असलेल्या श्रीमती जीजाबाई संदीप तिडके (३३, रा. शहापूर ता. खामगाव) या विधवेने ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिच्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर ०६मे २०२१ ते ०७ जून २०२२या कालावधीत शहापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात सासरच्यांनी अपशकुनी म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. चापटाबुक्यांनी मारहाण करीत केस ओढून खाली पाडले. तसेच पतीच्या नावे असलेली जमिन वहिती करण्यासाठी एक लाखांची मागणी केली. त्याचवेळी घरात तसेच शेतीवर राहण्यास मज्जाव करीत जमिनीवर हातपाय दाबून ठेवले. तर सासºयाने अंगावर राख फेकत, काळी जादू करून जिवाने ठार करण्याची धमकी दिली, काहीतरी मंत्रोपचार केला. कैचिने विवाहितेचे केस कापून तिच्या अंगावरून लिंबूही उतरविले. तर काहींनी हातावर सुई टोचून रक्त काढले. जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून लावले. त्यामुळे आपण घर सोडले. त्यानंतर वडिलांच्या घरी राहून न्यायासाठी न्यायालयीन लढा दिला. फियार्दीच्या लेखी रिपोर्ट व वि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं. 2 खामगांव यांचा फौजदारी संहिता कलम १५६ (३) प्रमाणे आदेश झाल्याने ग्रामीण पोलीसांनी सासरच्या सात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल -याप्रकरणी गौतम रूस्तम तिडके (६०), सुनंदा गौतम तिडके (५५), मिलिंद गौतम तिडके (३५), विशाखा मिलिंद तिडके (३०) सर्व रा. शहापूर ता. खामगाव आणि सुरेश जनार्दन सदांशिव (३८), अर्चना सुरेश सदांशिव (३२) रा. सुकोडा टाकोडा खडकी ता. अकोला, प्रमोद गवई (४०)रा.दिग्रस बु. ता. पातूर जि. अकोला यांच्या विरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ४८९- अ, ३४ तसेच जादूटोना प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.