नागपूर - अनेक गुन्ह्यात सहभागी असलेला अट्टल गुन्हेगार साईमन फ्रॉन्सिस अँथोनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास कारागृह परिसरात ही घटना घडली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपी साईमन याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली. होती.२८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिल्यामुळे अजणीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफील असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. तो पळत असल्याचे पाहून अजनी पोलीस तसेच कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र नगरसेवक लक्ष्मी यादव यांच्या घराच्या गल्लीतून अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार तसेच नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यामुळे या भागातील गस्तीवरील पोलिस पथके शोधाशोध करू लागले. रात्री १० वाजेपर्यंत तो हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांना कारवाईचा धाक या घटनेमुळे पोलिसंवर मोठे दडपण आले आहे. जे पोलीस साईमनला घेऊन कारागृहात पोचले होते. त्यांना स्वतःवरील कारवाईचा धाक वाटत आहे. आरोपी लवकर सापडला नाही तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.
अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत कारागृह परिसरातून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:05 AM