मडगाव - रस्त्यावर ऑम्लेट पाव खाताना दुसऱ्या एका गाडीचा धक्का बसला या कारणावरुन त्या गाडीवाल्याचा पाठलाग करुन त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून मडगाव पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. क्षुल्लक कारणासाठी या दोघांवरही सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आहे.मडगावचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मूळ बिहारचा असलेल्या सुरेशकुमार सिंग या कंत्राटदाराला मारहाण करुन त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रुमडामळ-दवर्ली येथील प्रितेश चव्हाण (वय 20) आणि मांडप-नावेली येथील विलास नाईक (वय 21) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 427, 341 आणि 304 या अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, 12 ऑक्टोबर रोजी सिकेटी-नावेली येथे ही घटना घडली होती. प्रितेश व विलास हे दोघेही रस्त्याच्या बाजूला ऑम्लेट पाव खाण्यासाठी थांबले असता सुरेशकुमार यांच्या कारने त्यांच्या बाईकला धक्का दिला. हा धक्का दिल्यानंतर कुमार याने तिथे न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भडकलेल्या त्या दोन्ही युवकांनी त्याचा पाठलाग करत त्याला सिकेटी-नावेली येथे अडविले आणि त्याला मारहाण केली.त्या घटनेनंतर फोंडा येथे काम करणारा सुरेशकुमार कामासाठी गेला असता 18 ऑक्टोबर रोजी कामावर असतानाच तो भोवळ येऊन खाली पडला. त्याला फोंडा येथील आयडी रुग्णालयात दाखल केले असता झालेल्या मारहाणीची त्याने तेथील डॉक्टरांना माहिती दिली. त्याला लगेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदन झाल्यानंतर त्याला झालेल्या मारहाणीमुळे त्याचे बरगडीचे हाड मोडून त्यामुळे फुफ्फुसात झालेल्या जखमेचे इन्फेक्शन झाल्यामुळे मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला मडगाव पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
क्षुल्लक कारणावरुन मारहाण; कंत्राटदाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 8:58 PM