लोणी काळभोर : लग्नात मानपान केला नाही, तसेच घर बांधण्यासाठी माहेरवरून पैसे न आणल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासू, जाऊ व नणंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सपना विशाल तलरेजा (वय २८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, मुळ गाव सिद्धार्थनगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. तर सासू सुमन भागचंद तलरेजा, पती विशाल भागचंद तलरेजा, नणंद ज्योती प्रमोद थोरात, जाऊ प्रतिभा विजय तलरेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सपना व विशाल तलरेजा यांचा विवाह २०१५ रोजी झाला होता. २२ मार्च २०१६ रोजी त्यांना एक मुलगी झाली. माहेरी बाळंतपण झाल्यावर सपना दोन महिने माहेरी गेली होती. ती बाळंतीण झाल्यावर तिला घरासाठी माहेरून १ लाख रूपये आणण्यासाठी वारंवार त्रास दिला. २३ एप्रिल रोजी दुपारी सपना यांच्या बहिणी व वहिनी भेटायला आल्या होत्या. सपना त्यांना घराजवळील गणपती मंदिरात भेटल्या. रात्री ही गोष्ट त्यांनी पतीला सांगितली. न सांगता माहेरच्या लोकांना भेटल्यामुळे पतीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तुला मारुन टाकतो व मी मरतो असे या वेळी पती म्हणत होते. त्या मुळे घाबरून सपना आपल्या मुलीला घेऊन तेथून निघून गेल्या. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:55 PM