हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाला बंबल या डेटिंग एपवर तरुणीशी मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने तरुणाला दारू पाजली आणि नंतर घरात ठेवलेले सोनं, रोख रक्कम आणि आयफोन 14 घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दोन दिवसांनी तरुण शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
गुरुग्राममधील डीएलएफ फेज 4 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. येथे राहणारा रोहित गुप्ता याने पोलिसांना सांगितलं की, बंबल डेटिंग एपच्या माध्यमातून त्याची साक्षी उर्फ पायल नावाच्या मुलीशी भेट झाली होती. मुलीने रोहितला सांगितलं होतं की ती दिल्लीची आहे आणि सध्या गुरुग्राममध्ये तिच्या मावशीकडे राहत होती.
रोहित पुढे म्हणाला, 1 ऑक्टोबर रोजी साक्षीने मला फोन करून भेटायचं असल्याचं सांगितलं. रात्री 10 च्या सुमारास गुरुग्राममधील सेक्टर 47 मधील डॉकयार्ड बारजवळ मला घेण्यासाठी बोलावलं. मी तिथे पोहोचलो आणि साक्षीला घेऊन घरी येऊ लागलो. वाटेत जवळच्या दुकानातून दारू आणली आणि माझ्या घरी आलो.
रोहितने सांगितले की, घरी येताच साक्षीने त्याला किचनमध्ये ठेवलेल्या फ्रीजमधून बर्फ आणायला पाठवलं. साक्षीपासून दूर असताना तिने कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी पदार्थ मिसळला. नंतर दोघं दारू प्यायलो. औषधाचा प्रभाव इतका मोठा होता की मला दोन दिवसांनी म्हणजे 3 ऑक्टोबरच्या सकाळी जाग आली. साक्षी माझ्या घरातून बेपत्ता असल्याचं मला आढळलं. माझी सोन्याची चेन, आयफोन 14 प्रो, 10,000 रुपये रोख, क्रेडिट आणि डेबिट कार्ड गायब होतं.
"बँक खात्यातून काढले 1.78 लाख"
रोहित गुप्ताने तक्रारीत म्हटलं आहे की, या घटनेनंतर मी घाबरलो. साक्षीशी संपर्क होऊ शकला नाही. मी माझं बँक खाते तपासलं आणि माझ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून 1.78 लाख रुपये काढण्यात आल्याचं आढळलं. साक्षी उर्फ पायल नावाची मुलगी अद्याप फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशी सुरू आहे. मंगळवारी गुरुग्राममधील सेक्टर 29 पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.