फरिदाबाद: हरयाणाच्या फरिदाबादमध्ये १२ दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. नायजेरियन व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र प्रत्यक्षात हत्या करण्यात आलेली व्यक्ती बल्लभगढची रहिवासी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. मृताचं नाव पवन असून तो एका विवाहित महिलेसोबत २ वर्षांपासून लिव इनमध्ये राहत होता. दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. याच वादानं टोक गाठलं आणि महिलेनं पेट्रोल टाकून पवनला जिवंत जाळलं. सेक्टर-६५ क्राईम ब्रांचनं आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमागचं कारण समोर येताच पोलिसांना धक्का बसला.
मूळची पंजाबच्या पठाणकोटची असलेल्या महिलेचा पती फरिदाबादमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिला दोन मुली आहेत. महिलेच्या पतीचं २०१९ मध्ये कर्करोगानं निधन झालं. त्यानंतर तिला कंपनीत त्याच्या जागी नोकरी मिळाली. पवन तिच्याच कंपनीत कामाला होता. पुढे दोघांची मैत्री झाली आणि २०१९ पासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. या कालावधीत महिलेच्या दोन्ही मुली पंजाबमध्ये राहत होत्या.
महिलेची १४ वर्षांची मोठी मुलगी आईसोबत राहण्यासाठी बल्लभगढला आली. त्या मुलीसोबत पवननं छेडछाड केल्याचा आरोप आहे. मुलीनं झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यावरून महिलेचं आणि पवनचं भांडण झालं. दिवसेंदिवस वाद वाढू लागले. त्यानंतर महिलेनं पवनला ठार करण्याची योजना आखली.
माझ्यासाठी तू काय करू शकतोस?पवनकडे एक कार होती. महिला १६ ऑक्टोबरला पवनला दिल्लीला घेऊन गेली. तिथे तिनं आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला बोलावून कार घरी नेण्यास सांगितलं. महिलेनं १५ दिवसांपूर्वीच बल्लभगढहून २ लीटर पेट्रोल आणि झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. तू माझ्यासाठी काय करू शकतोस, असा प्रश्न महिलेनं पवनला विचारला. त्यावर काहीही करू शकतो, असं उत्तर पवननं दिलं. त्यानंतर महिलेनं पवनला गोळ्या खाण्यास सांगितलं. पवननं गोळ्या खाल्ल्या आणि तो बेशुद्ध पडला.
महिलेनं दिल्लीहून एक रिक्षा पकडली आणि ती पवनला घेऊन फरिदाबादला गेली. सेक्टर-७५ मध्ये एका निर्जनस्थळी तिनं पवनच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि त्याला पेटवून दिलं. १७ ऑक्टोबरला पोलिसांना मृतदेह सापडला. पोलिसांना तो एका नायजेरियन व्यक्तीचा वाटला. नायजेरियन व्यक्तींना बोलावून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही मृतदेह ओळखला नाही.