पलवल: हरियाणाच्या पलवलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कॅम्प पोलिस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 19 वर असलेल्या हुडा उड्डाणपुलावर एका जोडप्याला पोलिस पीसीआर वाहनाने धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर पोलिसांचा अमानवी चेहराही समोर आला आहे. पोलिस पती-पत्नीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. जखमी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या घटनेबाबत तपास अधिकाऱ्याने सांगितले की, मिंडकौला गावात राहणाऱ्या प्रेम नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने सांगितले की, 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ती पती रणजीतसोबत बल्लभगड येथून बाईकवरून घराकडे जात होती. वाटेत हुडा चौकातील उड्डाणपुलावर पोलिसांच्या भरधाव पीसीआर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पीसीआर वाहन वेगात असून चालक निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे पोलिसांवर गंभीर आरोप या धडकेमुळे पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले, असे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांच्या गाडीने त्या दोघांना शासकीय रुग्णालयात आणले, पण तेथे दोघांना गेटवर सोडून वाहन चालकाने पळ काढला. उपचारादरम्यान, पती रणजीतचा मृत्यू झाल्याचे तिला नंतर समजले. या अपघातात महिलेलाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.