मुंबई - ऑनलाईन फ्रॉड किंवा मोबाईल फोनद्वारे लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात चांगलंच वाढल्याचं समोर आलं आहे. फसवणुकीचं हे रॅकेट जामताडा येथून चालवलं जात असल्याचं पोलिसांच्या तपासणीत उघड झालं होतं. आता, हरयाणापोलिसांनी नूँह येथील नवीन जामताडावर कारवाई करत तब्बल १०० कोटी रुपयांच्या सायबर फ्रॉडचा खुलासा केला आहे. येथील आरोपी हे डुप्लीकेट सीमकार्ड, आधार कार्डद्वारे ऑनलाईन फ्रॉड करुन लोकांची आर्थिक लुट करत होते. विशेष म्हणजे खोटे बँक अकाऊंटही या लोकांनी उघडले होते. ज्यामध्ये, हे फसवणुकीतून आलेले पैसे टाकत.
राजधानी दिल्लीपासून ते अंदमान-निकोबार येथील लोकांचीही फसवणूक या जामताडा आरोपींनी केली आहे. आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर देशभरातून तब्बल २८,००० केस ट्रॅक झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक्षक वरुण सिंगेला यांनी म्हटले की, २७-२८ एप्रिल रोजी रात्री ५००० पोलिसांच्या १०२ पथकांनी जिल्ह्यातील १४ गावांवर एकत्रितपणे छापा टाकला. त्यावेळी, १२५ संशयित हॅकर्संना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी, ६६ आरोपींची ओळख पटवून त्यांना अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटकेतील आरोपींच्या पोलिस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांची फसवणूक केली आहे. आता, पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल आणि सीम कार्डमधूनही चौकशी सुरू केली आहे. यातून समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून तब्बल २८,००० नागरिकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या आरोपींवर देशभरातून यापूर्वीच १३४६ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तर, २१९ बँक खाते आणि १४० युपीआय खात्यांचीही माहिती उघडकीस आली आहे.
दरम्यान, झारखंडमधील जामताडा हेच ऑनलाईन फसवणुकीचं केंद्र असल्याचं समोर आलं होतं. मात्र, देशातील ९ राज्यात तीन डझनपेक्षा अधिक गावांतून हा सायबर क्राईमचा गड चालवला जात असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. त्यानुसार, हरयाणा पोलिसांनी नवीन जामताडा येथे कारवाई केली आहे.