आशिष गावंडे, अकाेला: शहरासह जिल्ह्यातील सराइत व अट्टल गुन्हेगारांचा बिमाेड करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत व तडीपारीचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील सराइत आठ गुन्हेगारांना दणका देत त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश ‘एसपी’सिंह यांनी जारी केला आहे.
सुपारी घेऊन धाकदपट करुन मुळ मालकाकडून कमी पैशात जमिन, प्लाॅट, दुकाने खाली करुन घेणे, टाेळीने संघटित गुन्हेगारी करुन समाजात भिती पसरवणे,शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना धाकदपट,मारहाण करुन त्यांच्याकडून पैसे उकळणे व पूर्ववैमनस्यातून एकमेकांवर प्राणघातक हल्ला करुन सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या गावगुंडांनी शहरासह जिल्ह्यात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. अशा गावगुंडांचा व टाेळीने संघटित गुन्हे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बाह्यावर खाेचल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी शहरातील विशाल भगवान पाखरे रा. शिवणी, करण रामचंद्र तायडे रा. क्रांतीनगर शिवणी, सागर शांताराम अवचार रा. आंबेडकर नगर, धनंजय दिलीप पवार रा. गजानन नगर, डाबकी रोड तसेच जयराज सतिश पांडे रा. रतनलाल प्लॉट, अकोला यांना कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
टाेळीला एक वर्षांसाठी हद्दपार
पातूर तालुक्यातील चान्नी पाेलिस स्टेशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्या विजय रामदास चंचरे (३९),रामसिंग रामदास चंचरे (३०), गजानन रामदास चंचरे (३४) सर्व रा. उमरा यांच्यावरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे लक्षात घेता या तीन जणांच्या टाेळीला कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधिक्षकांनी जारी केला आहे.
गावगुंडांच्या बैठका;आपसात समझाैता
पाेलिस यंत्रणेने कायद्याचा बडगा उगारताच अनेक गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे. आपसातील वाद शमविण्यासाठी स्वयंघाेषित दादा,भाऊ,भाइ,सेठकडून मध्यस्थांमार्फत गुप्त बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाेलिस यंत्रणेकडून कारवाइ हाेण्यापूर्वीच काही ठराविक गावगुंडांना संभाव्य कारवाइची पूर्वसूचना काेण देते, अशा झारीतील शुक्राचार्यांचा बंदाेबस्त हाेणार का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.