हाथरसमधील पीडित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्याविरोधात 1 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.हाथरसच्या हृदयद्रावक घटनेचे पडसाद आता संपूर्ण भारतात उमठण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या प्रकरणी राजीनामा मागितला आहे. त्यामुळे देशातले राजकारण देखील या प्रकरणावरून तापत चालले असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिली आहे. या मुलीवर १४ सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी शेतावर जाताना तिच्यावर बलात्कार केला होता. दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळ्या दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. नंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. हाथरस येथील प्रभारी कोतवाली यांनी त्यांना पोलिस लाइनमध्ये पाठविले. प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेबुलरी (पीएसी) महिलेच्या घरी तैनात होते. बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी परस्पर पीडित मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता काल मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने अजून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.