पूनम अपराज
मुंबई - दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. १९ जुलैला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता असून आरोपीला या गुन्ह्याच्या छडा लावून तिसऱ्या दिवशी गजाआड केले होते. सहा महिन्यांनी आपली चोरट्याने लंपास केलेली सोनसाखळी मिळाल्याने मराठी अभिनेत्रीने हॅट्स ऑफ शिवाजी पार्क पोलीस असे उद्गार काढत आभार मानले आहेत. आरोपीचे नाव हनीफ शेख असून त्याच वय ३२ वर्ष आहे. तो धारावी येथील राहणारा असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर १९ जुलैला रात्री ८.४५ च्या सुमारास शिवाजी पार्क येथे वॉल्कसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर मोबाईलवर बोलत बसल्या होत्या. दरम्यान एक इसम टाईम क्या हुआ! विचारू लागला. त्यावर सविता मालपेकर यांनी घड्याळ घातले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या इसमाने मोबाईल पाहून सांगा वेळ अशी विनवणी केली होती. पण मोबाईलवर बोलायचं होत असल्याने सविता मालपेकर यांनी वेळ काय झाली हे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर सविता या पुन्हा स्काऊट हॉलच्या दिशेने वॉल्क करू लागल्या. त्यावेळी मागून त्यांच्या गळ्यावर कोणीतरी झडप घातली. दरम्यान सविता मालपेकर यांचा ड्रेस चोरट्याने फाडून सोनसाखळी लंपास केली.
त्याचवेळी शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन सविता यांना आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेले. ताबडतोब घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासून चोराची ओळख पटवण्यात आली होती. तक्रार दाखल करून शिवाजी पार्क पोलिसांनी चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर शिवाजी पार्क पोलिसांनी कंबर कसून तिसऱ्या दिवशी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्ब्ल सहा महिन्यांनंतर सविता मालपेकर यांची हरवलेली सोनसाखळी परत मिळाली आहे. पोलीस उपायुक्त प्रणव अशोक, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे आणि पोलीस धांडे, गावित यांच्यासह संपूर्ण पथकाचे सविता मालपेकर यांनी लोकमतशी बोलताना आभार मानले आहेत.