कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) कानपूर जिल्ह्यात ३ जून रोजी कानपूर नगरच्या नई सडक भागात उसळलेल्या हिंसाचाराचे एकामागून एक खुलासे होत आहेत. आता मास्टरमाईंड (Mastermind) हयात जफर हाश्मी आणि त्याच्या साथीदारांना परदेशातून आर्थिक मदत केली जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, २०१९ पासून हाश्मीला परदेशातून फंडिंग (Foreign Funding) मिळत होतं. २०१९ मध्ये कानपूरच्या बाबुपुरवा भागातील एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले होते. या बँकेच्या खाते क्रमांक (Bank account number) ५००१४७१७८३८ मध्ये ३० जुलै २०१९ रोजी तीन कोटी ५४ लाख रुपये जमा करण्यात आले. सप्टेंबर २०२१ रोजी एकरकमी ९८ लाख रुपये काढण्यात आले. सध्या या खात्यात एक कोटी २७ लाख रुपये पडून आहेत.तसेच अन्य दोन खात्यांची माहिती तपास यंत्रणांना प्राप्त झाली आहे. या खात्यांमध्ये अवघ्या दोन ते तीन वर्षांत ४७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. आता या खात्यांमध्ये केवळ साडेअकरा लाख शिल्लक आहेत, तर ही खाती २०१९ मध्येच उघडण्यात आली होती. आता पोलीस या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. लवकरच अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाची चौकशी करेल. याशिवाय आज कानपूर पोलिसांनी हाश्मीच्या रिमांडचीही मागणी केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, एक सोशल मीडिया ग्रुपही समोर आला आहे ज्यामध्ये लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कानपूर हिंसाचार प्रकरणात पोलीस आरोपींवर कडक कारवाई करत असताना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचार भडकवणारे व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह कमेंट करत आहेत. हिंसाचार भडकावल्याप्रकरणी आरोपी नदीम कुरेशी याच्या नावाने हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये समाजवादी पक्षाचे दोन आमदार हाजी इरफान सोळंकी, जे सिसामळचे आमदार आहेत आणि आर्य नगर विधानसभेचे आमदार अमिताभ बाजपेयी, तसेच सपा जिल्हाध्यक्ष इम्रान हे गटातील एका विशिष्ट धर्माविरोधात प्रचार करत असताना त्यांना काढून टाकण्यात आले. त्यांच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता या व्हॉट्सॲप ग्रुपवरून शेअर केलेला आक्षेपार्ह स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याची दखल घेत एसआयटीच्या पथकाने सोशल मीडियावर कारवाई केली आहे.
कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला मिळत होतं परकीय फंडिंग? 3 वर्षात सुमारे 48 कोटी रुपये जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 3:44 PM