ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकाच्या मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या साठ्यामध्ये एके ५६ सारख्या रायफलचाही समावेश असून, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या साठ्यातील ही शस्त्रे असावीत, असा पोलिसांना संशय आहे.अंमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने ५ जुलै रोजी मुंबईतील नागपाडा येथील जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपीन श्रॉफ यांना अटक केली होती. आरोपींच्या चौकशीदरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील गोरेगाव येथील बांगुरनगरच्या क्रांती चाळीत खंडणी विरोधी पथकाने छापा टाकला. या चाळीमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्य नईम फईम खान याचे घर आहे. या घरातील एका पलंगातून पोलिसांनी घातक शस्त्रसाठा हस्तगत केला. या शस्त्रसाठ्यामध्ये एके ५६ रायफल, तीन मॅगझीन्स, १0८ जिवंत काडतुसे आणि दोन पिस्टलचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी नईम खानची पत्नी यास्मीन हिला अटक केली.१९९३ च्या बॉम्बस्फोटावेळी पाकिस्तानातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आला होता. त्यापैकी बराचसा साठा पोलिसांनी हस्तगत केला. मात्र तीन अत्याधुनिक रायफली कुठेतरी दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना होती. नईम खानच्या घरातून हस्तगत केलेली रायफल त्यापैकीच असावी, असा पोलिसांना संशय आहे. विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शस्त्रांची नियमीत देखभाल होत होती, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. ही घातक शस्त्रे बाळगण्याचा नेमका उद्देश काय, ती कधीपासून आरोपीच्या ताब्यात होती, त्यांनी ती कुणाकडून मिळवली या प्रश्नांची नेमकी उत्तरे चौकशीतून मिळतील असे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घोडके, विलास कुटे, रमेश कदम, हेमंत ढोले, अविनाश महाजन, संदेश गावंड, प्रशांत भुरके आदींच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली.
दाऊदच्या हस्तकाकडून एके ५६ सह घातक शस्त्रसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 7:50 PM