डोंबिवली: बायकोसह मौज मजा करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून झटपट पैसे कमावण्यासाठी व्यवसायाने हेअर ड्रेसर असलेला नवरोबा दुचाकीचोर बनल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यासह पाच जणांना दुचाकीचोरीच्या गुन्हयात मानपाडा पोलिसांनीअटक केली आहे. आरोपींमध्ये भंगारविक्रेत्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी 17 दुचाक्या आणि 23 दुचाक्यांचे इंजिन, पार्टस असा तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सध्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर दुचाकी चोरटयांचा शोध घेण्याकामी विशेष पथके स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गठीत केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांच्या पथकाने कसोशीने केलेल्या तपासात अंबरनाथ पालेगाव येथे राहणा-या दीपक सलगरे याला अटक केली. दीपक हा दुचाकी चोरायचा आणि त्याचा सहकारी राहुल डावरे याच्या मदतीने दुचाकी स्वस्त दराचे आमिष दाखवून गरजवंतांना विकायचा. या गाडया फायनान्स कंपनी मधून आणल्या आहेत असे तो ग्राहकांना सांगायचा आणि चोरीच्या गाडया त्यांच्या माथी मारायचा. काही दुचाकी दीपक भंगार व्यवसाय करणा-या चिनमून चौहान उर्फ बबलू यास विकल्या. चिनमून या गाडया स्क्रॅप करून त्या गाडयांचे पार्ट तो धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांना विक्री केल्याचे तपासात समोर आले.कृत्याबाबत बायको अनभिज्ञदीपक सलगरे याचा नुकताच प्रेमविवाह झाला होता. व्यवसायाने हेअर ड्रेसर असलेल्या दीपकचे दावडी परिसरात सलून होते. पण वर्षभरापूर्वी ते बंद पडले. त्यानंतर तो घरोघरी जाऊन केस कापायचा. बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी त्याला पैसे कमी पडत होते. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला होता. दरम्यान त्याच्या या कृत्याची बायकोला पुसटशीही कल्पना नव्हती. दरम्यान दीपक विरोधात मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर, बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयांची उकल झाली आहे.चोरीच्या गाडयांची खरेदी नकोनागरीकांनी स्वस्त दुचाकीच्या आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाकी विकत घेऊ नये अस आवाहन पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी केले आहे. अन्यथा यापुढे अशा दुचाकी विक त घेणा-यांवरही देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असे ते म्हणाले.