लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साहेब, बॉम्बब्लास्ट होणार... गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या कॉलने मुंबई पोलिसांची दमछाक वाढवली आहे. त्यामुळे अशाप्रकारे कॉल करून खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये १८ हॉक्स कॉल करण्यात आले. २०२२ मध्ये हाच आकडा १५ होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत ११ खोट्या कॉलची भर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पडली. बहुतांश कॉल हे दारूच्या नशेत किंवा मानसिक स्थिती ठीक नसलेल्यांकडून येत आहेत. गेल्या काही दिवसांत आलेल्या कॉलमध्ये दारूच्या नशेत, राग किंवा बदला घेण्याच्या भावनेतून कॉलचे प्रमाण वाढत आहे. मात्र, इथून पुढे अशाप्रकारे फोन करून खोटी माहिती देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत थेट अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
सह पोलिस आयुक्तांनाही कॉल वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना थेट अनोळखी व्यक्तीने कॉल करून मीरा भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असून, पोलिस पाठवा असा कॉल केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने आपण आमदार यशवंत माने असून, मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
अशी होते धावपळ.. नियंत्रण कक्षात कॉल येताच तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यासह बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकासह सर्व यंत्रणांना याची माहिती दिली. संबंधित परिसर रिकामा करून तपासणी केली जाते. कॉल खोटा असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी शेकडो मनुष्यबळ कामाला लागते. त्यामध्ये काही न आढळल्यास कॉलधारकाचा शोध घेण्यास अतिरिक्त यंत्रणावर ताण वाढतो.
काय कारणे ? आतापर्यंतच्या समोर आलेल्या घटनांमध्ये दारूच्या नशेत मित्राला, नातेवाइकाला धडा शिकविण्यासाठी खोटे कॉल केल्याचे दिसून आले, तर काही प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या पतीला दहशतवादी असल्याचे भासवले, तर मानसिक ताणतणाव, खोडसाळपणा तसेच पोलिसांना कामाला लावण्यासाठी कॉलची भर पडत असल्याचे वेगवगेळ्या कारवाईतून समोर आले.