देवास (मध्य प्रदेश) : देवास जिल्ह्यात पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघड झाला असून, आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आपल्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन सुरेंद्र चौहान नावाच्या व्यक्तीने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.
देवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह ताब्यात घेतले. हे पाचही जण गेल्या १३ मेपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा सतत शोध घेत होते. बेपत्ता झालेल्यांत एक महिला, तीन युवती आणि एका युवकाचा समावेश होता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी तपास केल्यावर एकेक करून त्यांनी हत्याकांडाशी संबंधित पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेला रस्त्यावर सुरेंद्र चौहानच्या शेतात खड्ड्यात पुरलेले पाचही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जवळपास दहा फूट खोदकाम करून मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस या हत्याकांडाचा संबंध शेताचा मालक सुरेंद्र याच्याशी जोडून तपास करीत आहेत. सुरेंद्र याचे एका युवतीशी प्रेम प्रकरण सुरू होते व त्यातून हे भीषण हत्याकांड केले गेले.
साथीदारांची घेतली मदत मृतदेह ममता मोहनलाल कास्ते (४५), रूपाली मोहनलाल (२१), दिव्या मोहनलाल (१४) पूजा रवी ओसवाल (१५), पवन रवि ओसवाल (१४) यांचे आहेत. पोलिसांनी सहा आरोपींची चौकशी केल्यावर मुख्य आरोपी सुरेंद्र याने त्याच्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन साथीदारांच्या मदतीने कुटुंबाची हत्या केली, असे उघड झाले.