फुलंब्री (औरंगाबाद ) : पत्नी व दोन मुलीची हत्या करून एका व्यक्तीने स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील पिंप्री सताळा येथे उघडकीस आली. कृष्णा तात्याराव देवरे (३४ ), शिवकन्या कृष्णा देवरे (२८), सर्वदा (९) व हिंदवी (६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण फुलंब्री तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा तात्याराव देवरे हे तालुक्यातील पिंप्री सताळा येथे बोरगाव रस्त्यावर पत्नी शिवकन्या, मुली सर्वदा व हिंदवी सोबत राहत. कृष्णा हे लाईट फिटिंग व वेल्डिंगची छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करत. दोघा पती-पत्नीमध्ये मागील काही वर्षांपासून वाद होते. यामुळे मागील तीन वर्षांपासून शिवकन्या माहेरी बोदवड (ता. सिल्लोड ) येथे राहत असे.
यादरम्यान मोठी मुलगी पिंप्री येथे वडीलांकडेच होती. तर लहान मुलगी तिच्या आई सोबत होती. या वर्षीच तिचे गावातील जि.प.च्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला होता. जून-जुलै मध्ये नातेवाईकांनी दोघांमध्ये समझोता करुन समेट घडवला व शिवकन्याला सासरी आणले. परंतू त्यानंतर ही दोघात अधूनमधून भांडणे सुरूच होते.
सततच्या भांडणामुळे कृष्णाच्या आई-वडीलांनी दोघांना वेगळे केले होते. त्यामुळे शेजारीच असलेल्या दुसऱ्या घरात ते राहत. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्री सर्वजण जेवण करुन झोपे गेले. तत्पूर्वी दोघा पती-पत्नीत काहीतरी कारणांवरून भांडण झाले. याचा आवाज कृष्णाच्या वडीलांना व कुटुंबातील इतर सदस्यांना गेला होता. परंतू त्यांच नेहमीचे भांडण असल्याने राग शांत होईल व झोपी जातील असे म्हणून सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतू, इकडे कृष्णाच्या डोक्यात वेगळेच होते, त्याने मध्यराञी पोटच्या दोन्ही मुलींचा गळा आवळून त्यांना यमसदनी पाठवले. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी उशीर झाला तरी कृष्णाच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता, घरातून कोणाचा आवाजही येत नव्हता तेव्हा त्याच्या वडीलांनी दरवाजाच्या फटीतून बघितले असता मुलगा छताल गळफास घेऊन लटकलेला असल्याचे दिसून आले. तसेच त्याने, ''पोलिस येईपर्यंत कोणी दरवाजा उघडू नये'' अशी एक चिठ्ठी दरवाजाच्या बाहेरील बाजूस चिटकून ठेवली होती. यानंतर कृष्णाच्या वडिलांनी पोलिस व गावातील इतर नागरिकांना याची माहिती दिली. पोलिस आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी घरामध्येही अन्य देवाण घेवाणीची लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळुन आली आहे. दोन्ही चिठ्ठ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे.
माहिती समजताच वडोदबाजार ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी कर्मचार्यां समवेत घटनास्थळी धाव घेऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आम्रपाली मगरे, डॉ. जे पी सावंत , डॉ. सय्यद उमर यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान व ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.