मुंबई - ऑनलाईन लग्न जुळविणाऱ्या एका मॅट्रिमोनिअल पोर्टलवर दोघांनी आपली माहिती अपलोड केली होती. ऑनलाईन पाहताक्षणी दोघांना एकमेकांचे प्रोफाइल आवडले आणि प्रेमात पडले. शेवटी दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाह २०१३ मध्ये झाला. त्यानंतर दोघेही सुखाने संसार करणार होते. मात्र मधुचंद्राच्या रात्री पत्नीने त्याला वैद्यकीय कारण सांगून अंगाला स्पर्श करू दिला नाही. त्यानंतरही ती पतीला टाळू लागली. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. अखेर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले आणि एके दिवशी मिळालेल्या माहितीमुळे पतीच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याची पत्नी स्त्री, नसून चक्क पुरुष होती. ती ‘स्त्री’ आहे की ‘पुरुष’ हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही कुटुंब कोर्टाची पायरी चढले आहेत. दोन्ही कुटुंब आपली बाजूच खरी असल्याचा दावा करत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणारे निवृत्त सनदी अधिकार्याच्या मुलाचा विवाह, ऑनलाईन लग्न जुळविणाऱ्या पोर्टलवरून २०१३ मध्ये हैदराबाद येथे राहणार्या एका डॉक्टर तरुणीशी जुळला. मूळची ती औरंगाबादची होती. तिच्या जन्म दाखल्यात मुलाऐवजी तिची नोंद मुलगी अशी आहे.
२०१३ साली मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता. मुलगा हा एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता तर मुलगी ही डॉक्टर आहे. त्यामुळे दोन्हीकडील कुटुंब या विवाहामुळे खुष होते. मात्र त्यांचा आनंद काही जास्त टिकला नाही. मात्र, मधुचंद्राच्या रात्री तिने पतीला आपल्या पासून दूर ठेवले. मला स्पर्श करू नका मला त्वचेची एलर्जी असल्याचे सांगून तिने त्याला लांब केले. त्यानंतर हे जोडपे मधुचंद्र साजरा करण्यासाठी परदेशात गेले. त्या ठिकाणी देखील तिने त्याला स्पर्श करू दिला नाही. दोघेही काही दिवसात भारतात परतले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. अशाही परिस्थितीत मुलाने बंगळूर येथे कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला.