कल्याण - पोलिस असल्याची बतावणी दुचाकी घेऊन पसार झालेल्या तोतया पोलिसाला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या अडीच तासात अटक केली आहे. दिलीप पाटील असे भामट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. त्याने याआधीही अशाप्रकारे गुन्हे केल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे.
दुचाकीस्वाराला थांबवून आपण पोलिस असल्याची बतावणी करत दोन जणांनी त्याच्याकडून आधी पैशांची मागणी केली. दुचाकीस्वाराने पैसे नसल्याचे सांगताच या भामट्यांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेली दुचाकी ही त्याला पोलीस ठाण्यात येऊन साेडवावी लागेल, असे सांगून दुचाकी घेऊन पळ काढला. या दुचाकीस्वाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन शहानिशा केली असता पाेलिस असल्याची बतावणी करून दुचाकी घेऊन पसार झालेला भामटा ताेतया पाेलिस असल्याचे समाेर आले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ या भामट्याचा शोध सुरू केला. काेळसेवाडी पाेलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे आणि दिनकर पगारे यांच्या पथकाने घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून तपासाची सूत्रे फिरवित अवघ्या अडीच तासात ताेतया पाेलिसांना चिंचपाडा परिसरातून अटक करण्यात आली. ताेतया पाेलिसांचे नाव दिलीप पाटील असे आहे. ताे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यासाेबत त्याचा साथीदारही हाेता. त्याचा साथीदार पसार झाला आहे. पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.