अमरावती : एका विवाहितेच्या घरात अनधिकृतरित्या शिरून तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करण्यात आल्याची आणि तिला विवस्त्र करून त्याच स्थितीत बाहेर नेण्याची व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची संतापजन घटना समोर आली आहे. ही घटना वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल अशोक दारोकार (३६) रा. जरूड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, पीडित २७ वर्षीय विवाहिता व राहुलची पूर्वीची ओळख आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री पीडिता घरी एकटीच होती. यावेळी राहुलने तिला मोबाइलवर कॉल केला. महिलेने कॉल उचलल्यावर राहुलने तिला शिवीगाळ करून मी तुझ्या घरी येतो, असे म्हटले. त्यानंतर काही वेळाने तो महिलेच्या घरी पोहोचला. घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्यावर राहुलने तिला मारहाण केली. तिला विवस्त्र करून त्याच स्थितीत घराबाहेर नेण्याची धमकी दिली. महिलेने आरडाओरड केल्यावर राहुलने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
ते फोटो व्हायरल करण्याची धमकी -तिचे त्याच्याकडे असलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही राहुलने यावेळी दिली. तो प्रकार मंगळवारी रात्री ११ ते १२.३० दरम्यान घडला. या प्रकरणी पीडित महिलेने वरूड ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपी राहुलविरुद्ध १ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.