लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. प्रवाशांचे महागडे मोबाईल, लॅपटॉप चोरून तो विकायचा. अटक केल्यानंतर त्याने रेल्वेत ६ चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख ४७ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत लॉटरी खेळण्याची सवय असल्यामुळे त्याला चोरी करण्याची सवय लागल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.तुलसीदास, रा. गडचांदूर असे आरोपीचे नाव आहे. त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे. बारावी विज्ञानपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. वाईट संगतीमुळे त्याला जुगाराचे व्यसन लागले. कर्ज वाढल्यामुळे त्याने २८ डिसेंबर २०१९ पासून रेल्वेत चोरी करणे सुरु केले. महिनाभरात त्याने ६ चोऱ्या केल्या. गाडीतील टीसीला २०० रुपये देऊन तो एसी डब्यात प्रवास करायचा. बर्थवर ठेवलेला मोबाईल आणि लॅपटॉप उचलून पुढच्या स्थानकावर उतरायचा. चोरीचे साहित्य सहज कोणी घेणार नाही, याची त्याला जाणीव होती. म्हणून तो आपबिती सांगून दोन चार हजारात चोरीच्या वस्तू गहाण ठेवायचा. मिळालेल्या पैशातून पुन्हा लॉटरी खेळायचा. अलीकडेच त्याने नागपुरातील वेकोलि अधिकारी तेजस्वी गुराला यांचा जीटी एक्स्प्रेसमधून लॅपटॉप, दोन मोबाईल आणि रोख १० हजार असा एकून १.१० लाखाचा मुद्देमाल चोरी केला. त्या जीटी एक्स्प्रेसने विजयवाडा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. गुप्त बातमीदाराकडून तो चोरीच्या वस्तु विकण्यासाठी बल्लारशा रेल्वेस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचला. तो चहा टपरीवर येताच पोलिसांनी त्यास अटक केली. आतापर्यत त्याने जीटी, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलीस निरीक्षक कविकांत चौधरी, पोलीस हवालदार दीपक डोर्लिकर, पोलीस नायक रवींद्र सावजी, प्रशांत उजवणे, विनोद खोब्रागडे, संदीप लहासे, अमित चौधरी, त्रिवेदी, गौरीश राऊत, चंद्रकांत ठाकूर यांनी केली.
रेल्वेत चोऱ्या करून लावायचा 'तो' लॉटरी : २.५० लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:12 PM
रेल्वेगाड्यात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत लॉटरी खेळण्याची सवय असल्यामुळे त्याला चोरी करण्याची सवय लागल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या