डोंबिवली: गजरे विकण्याच्या धंदयातून मिळणारे तुटपूंजे उत्पन्न त्यात पत्नीचे आजारपण आणि तीच्या ऑपरेशनमध्ये वारेमाप झालेला खर्च यात आता घर कसे चालवायचे या आर्थिक विवंचनेत एकाने चोरीचा मार्ग पत्करल्याचे समोर आले आहे. एका 85 वर्षीय वृध्देचे तोंड दाबून तीला खाली पाडून तीच्या गळयातील 40 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढलेल्या या चोरटयाला 12 तासाच्या आत अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. कनू राजू वाघरी (वय 30) रा. ठाकुरवाडी, डोंबिवली पश्चिम असे त्या चोरटयाचे नाव असून त्याच्याकडील चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.
पश्चिमेकडील दिनदयाळ क्रॉस रोडवरील शिवसेना ऑफिसच्या पुढे गल्लीत मॉर्डन स्कूलच्या पाठीमागील परिसरातून सोमवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान कमल चौधरी (वय 85) या मॉर्निग वॉक करत होत्या. यादरम्यान एका 25 ते 30 वर्षे वयोगटातील एकाने त्यांच्या पाठिमागून येऊन त्यांचे तोंड दाबले आणि मागे खेचत जमिनीवर पाडले. त्यांच्या गळयातील 40 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या घटनेप्रकरणी चौधरी यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक कुलदिप मोरे, पोलिस हवालदार आर डी पाटणकर, राजेश पाटील, शंकर मोरे, पोलिस शिपाई कुंदन भामरे यांचे पथक नेमले होते.
तपासा दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण या वृध्द महिलेचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वर्णनावरून तरुणाचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार 12 तासाच्या आत पोलिसांनी कनूला रहात्या घरातून अटक केली. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते या ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळील सर्व पैसे खर्च झाले, त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचे तपासात समोर आले. त्याने याआधी अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.