पिंपरी : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला गेल्यानंतर तिच्या माहेरच्यांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यात जावयाने चाकूने सासरा व मेव्हण्याचा खून केला. तसेच सासऱ्याच्या वडिलांना चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर पत्नीला जबरदस्तीने घेऊन अमरावती येथून पुण्यात आलेल्या जावयाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने २४ तासांत अटक केली.
सासरा बंडू साबळे, मेव्हणा धनंजय साबळे, असे खून झालेल्यांचे नाव आहे. तसेच आजेसासरा विश्वनाथ साबळे, असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी सुरेश पर्वतकर (वय २३, रा. महावीर काॅलनी, अमरावती), असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याची पत्नी हर्षा (वय २२) तिच्या माहेरी कुरडपर्णा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे गेली होती. तिला घेण्यासाठी आरोपी पर्वतकर हा रविवारी (दि. १४) कुरडपर्णा येथे गेला. त्यावेळी सासरच्या लोकांशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणाच्या कारणातून त्याने सासरा बंडू साबळे, मेव्हणा धनंजय साबळे यांचा चाकून खून केला. तसेच आजेसासरा विश्वनाथ साबळे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर पत्नी हर्षा हिला मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून घेऊन अमरावती येथे गेला. तेथून ट्रॅव्हल्स बसने पुणे येथे आला.
युनिट एकच्या पोलिसांना याबाबत सोमवारी (दि. १५) माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या विश्लेषणावरून दोन तासांत खेड तालुक्यातील कुरुळी येथून आरोपी पर्वतकुमार याला ताब्यात घेऊन त्याची पत्नी हर्षा हिची सुटका केली.