पुणे : सहसंचालक (तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान) महेश सत्यवान बोटले (वय ५३) याला सायबर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.
आरोग्य विभाग गट (क) व गट (ड)चे पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर बोटले सदस्य असल्याने तसेच पेपर सेट करून ज्या संगणकावर ठेवला होता, त्या संगणकाचा ॲक्सेस त्याच्याकडे होता. त्यामुळे त्याने या संगणकातून सेट केलेला पेपर त्याचे आरोग्य भवन मुंबई येथील दालनातील संगणकावर काॅपी करून तो स्वत:चे फायद्याकरिता परीक्षा होण्यापूर्वी परीक्षार्थींमध्ये वितरीत करण्यासाठी प्रशांत बडगिरे याने पाठविलेल्या व्यक्तीकडे २३ किंवा २४ ऑक्टोबर रोजी दिल्याची माहिती आहे. त्यात त्याचा सहभाग निश्चित झाल्याने आज रात्री ९.४० मिनिटांनी त्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोग्य विभागाच्या या मेगा भरतीच्या परीक्षेच्या गैरव्यवस्थेवरून परीक्षेच्या अगोदर चारही बाजूने टीका होत होती. मात्र, तरीही ही परीक्षा तशीच राबविण्यात आली. त्यातून पुढे ‘ड’ परीक्षेचा पेपर फुटल्याचा गवगवा झाला. मात्र, गट ‘क’च्या पेपरविषयी काही माहिती पुढे आली नाही. पेपर फोडण्याची कार्यपद्धती लक्षात घेता गट ‘क’चाही पेपर फुटला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याची चौकशी केल्यास त्यातील घोटाळा समोर येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.