यवतमाळ : प्रेयसीचे दुसऱ्यासोबत संबंध आहे, असा संशय आल्याने प्रियकराने तिला निर्जनस्थळी नेवून दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. लोहारा पोलीस वेळीच पोहोचल्याने जखमी अवस्थेतच आरोपी प्रियकराला शासकीय रुग्णालयात दाखल केले. आता त्या आरोपी प्रियकराची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा, शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर या दोघांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शुभम हा आस्थावर जीवापाड प्रेम करीत होता. तो एका सूत गिरणीमध्ये मजूर म्हणून कामाला होता. गुरुवारी सकाळी घरुन निघताना त्याने कामावर जात असल्याचे सांगितले. तर आस्था पोस्ट ऑफीसमध्ये शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी आली होती. येथील मुख्य डाक कार्यालयातून शुभमने आस्थाला सोबत घेतले. यावेळी शुभमच्या मनात काही काळीबेरे आहे याचा अंदाज आस्थाला आला नाही. नेहमीप्रमाणे ते निर्जनस्थळी पोहोचले. आस्थाची हत्या केल्यानंतर शुभमने गळा चिरुन घेतला. त्याच्यावर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाक-कान-घसा विभागात उपचार सुरू आहे. येथील सहायक प्रा.डॉ. अनिकेत बुचे यांनी शुभमची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. सहा-सात दिवसाच्या उपचारानंतर तो पूर्णत: बरा होईल व त्याला सुटी देण्यात येईल असेही डॉक्टरांनी सांगितले.या खुनाच्या घटनेत आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी कलम ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शुभमची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक केली जाईल व गुन्हाचा पुढील तपास करण्यात येईल, असे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बॉक्समला माफ कराशुभमने आस्थाची हत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर आई, बाबा, ताई मला माफ करा अशी भावनिक पोस्ट केली. त्यानंतर हे हत्याकांड घडविले. शुभम सूत गिरणीमध्ये काम करीत होता. बराचसा पैसा तो आस्थावर खर्च करायचा. उरलेली रक्कम घरी द्यायचा. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. अशात त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचाही शोध पोलीस घेत आहे.