हेरगिरी व दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये तीन पाकिस्तानी ज्येष्ठ वकिलांची अॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नेमणूक केली होती. जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याकरिता भारताला ‘आणखी एक संधी’ देण्यात यावी, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले होते. कुलभूषण जाधव यांच्या वकिलाच्या नियुक्तीच्या प्रकरणात पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. गुरुवारी पाकिस्तानी प्रसिद्ध माध्यमांतील आलेल्या वृत्तानुसार, कोर्ट याप्रकरणी 6 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे.जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नेमण्याची भारताला आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश 3 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्याचवेळी पाकिस्तानने असे म्हटले होते की, त्याने भारताला न्यायालयीन आदेश कळविले आहेत, परंतु भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 16 जुलै रोजी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कौन्सुलर ऍक्सेस दिला. तथापि, भारत सरकारने नमूद केले की ही कौन्सुलर ऍक्सेस अर्थपूर्ण किंवा विश्वासार्ह नव्हती. आयसीजेच्या निर्णयामुळे पाक केवळ आपल्या अध्यादेशाचे उल्लंघन करत आहे, असे भारताने म्हटले आहे.त्याच वेळी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या संसदेने कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित अध्यादेशाची मुदत चार महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. अध्यादेशामुळे जाधव यांना त्याच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.