रोईंगपटू दत्तू भोकनळने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवापर्यंत तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 09:03 PM2019-07-24T21:03:45+5:302019-07-24T21:06:39+5:30
पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई - रोईंगपटू दत्तू भोकनळनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तक्रारदार पत्नीने आपली भूमिका मांडण्यासाठी हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तू यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रियाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळ याने हायकोर्टात याचिका दाखल केली. पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
रिओ आॅलिम्पिक २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ यांच्या विरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील शिपाई आशा दत्तू भोकनळ (२६) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आळंदी येथे २२ डिसेंबर २०१७ रोजी आपला दत्तू यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर आशा यांच्या घरी व पुणे येथे दोघे काही दिवस पती-पत्नीप्रमाणे एकत्रही राहिले. दत्तू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गावी जाऊन सर्वांसमक्ष लग्न करण्याचे ठरून लग्नाची खरेदीही केली. परंतु, सर्व तयारी करूनही दत्तू यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसून दवाखान्यात अॅडमिट असल्याचे सांगत ७ फेबु्रवारीला लग्नाला येणार नसल्याचे कळविले. तसेच पुन्हा फोन करून लग्नाविषयी विचारले तर विष घेऊन आत्महत्या करू, असेही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि, १३ व १४ फेब्रुवारी रोजी दत्तू भोकनळ आडगाव पोलीस मुख्यालय येथे आशा भोकनळ यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करीत वादावादी केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, संगमनेर येथे २४ फे ब्रुवारी २०१९ पुन्हा नातेवाइकांसमोर विवाह करण्याचे ठरले. लग्नाची तयारी करूनही पुन्हा लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी दत्तू यांनी लग्नास नकार देत आपला नाद सोडून देण्याचे सुनावले. दि. ३ मार्चला आशा यांनी पुणे येथे जाऊन दत्तू यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी एकदा लग्न केलेले आहे. पुन्हा विवाहसमारंभ करणार नाही व आपल्यासोबत घरीही नेणारही नसल्याचे सांगत आपली फसवणूक केल्याचा आरोप आशा भोकनळ यांनी फिर्यादीतून केला आहे.