लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या स्टॅण्डिंग वॉरंट अर्जावर सोमवारी पारनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्याविरोधात इतर मार्गाने फास आवळण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला आहे.
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याचा अविरत शोध घेत आहेत. तो मात्र प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. जरे यांची हत्या झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे एकत्र केले आहेत. आता केवळ बोठे याच्या अटकेचे आव्हान तपासी यंत्रणेसमोर आहे. पसार होताना बोठे याने स्वत:चा मोबाइल घरीच ठेवला आहे. त्यामुळे लोकेशन काढून त्याचा शोध घेणे हा पर्याय संपलेला आहे.
नजर न ठेवल्याने बेजार होण्याची वेळजरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे याची संशयास्पद हालचाल सुरू झाली होती. त्याच वेळी पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असती तर त्याच्या शोधासाठी एवढे बेजार होण्याची वेळ आली नसती. बोठे काळ्या कारमधून जामखेडला पसार झाला, तो पुण्यात डॉ. नीलेश शेळके याच्या संपर्कात आहे. अशीही चर्चा होती. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी तपासणी केली.