मुंबईत कोरोना महामारीने हैदोस घातलेला असताना धारावी परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. धारावी हा परिसर हा हॉटस्पॉट बनला होता. त्यावेळी धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी रमेश नांगरे यांनी केली. सध्या साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक असलेले रमेश नांगरे यांच्यावर काळाने झडप घातली आहे. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे.
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर असताना धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले रमेश नांगरे यांचं आज सकाळी हार्ट अटॅकने झोपेत असतानाच निधन झालं आहे. काल नाईट ड्युटी करून ते पहाटे घरी आले होते. सध्या ते साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते. लाॅकडाऊनच्या काळात ज्या धारावी पॅटर्नची चर्चा जगभरात झाली. त्यामध्ये नांगरे यांचंही योगदान होतं. दोन महिने पत्नी- मुलांना न भेटता ड्युटी बजावली होती. कोरोना पँडेमिकला वर्षही पूर्ण होतं असताना नांगरे यांच्या मृत्यूची आलेली ही बातमी धक्कादायक आहे.