गुरुग्राम : हरियाणातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मायलेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघीजणी गुरुग्राम शहरातील वर्धमान मंत्रा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाड्याने राहत होत्या. ६ जुलैला वडिलांनी हॉटेलमध्ये विष पिऊन जीव दिला होता. त्यानंतर मायलेकींनीही आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
वीणा शेट्टी (४६) आणि यशिका शेट्टी (२४) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. ६ जुलै रोजी गुरुग्रामच्या सेक्टर ५३ मधील एका हॉटेलमध्ये वीणा शेट्टी यांचे पती हरी शेट्टी यांनीही विष पिऊन आत्महत्या केली होती. हरी शेट्टी हे कर सल्लागार म्हणून कार्यरत होते, तर वीणा एका खासगी कंपनीत सेल्स विभागात काम करत होत्या. तर यशिका एमबीएचे शिक्षण घेत होती. जानेवरी २०२१ मध्येच शेट्टी कुटुंब गुरुग्राम शहरातील वर्धमान मंत्रा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाड्यावर घर घेऊन राहायला आले होते.
मायलेकीच्या आत्महत्येचं वृत्त समोर आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा वीणा बाथरुममध्ये आणि यशिका बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही.