ऑस्ट्रेलियामध्ये विचित्र अपघात घडला आहे. दोन हेलिकॉप्टर हवेतच एकमेकांवर आदळली, यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यावर हा अपघात झाला आहे.
क्वीन्सलँडचे पोलिस निरीक्षक गॅरी वॉरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कोस्टवरील मेनबीचवरून जात असताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. देशाच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोल्ड कोस्टमध्ये सुट्टीच्या दिवसात मोठी गर्दी असते.
दोन हेलिकॉप्टरमध्ये 13 लोक होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला, तीन गंभीर जखमी झाले आणि सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. काहींना काचेचे तुकडे लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये वाळूवर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष पडलेले, जमिनीवर कर्मचारी आणि आजूबाजूच्या पाण्यात अनेक जहाजे असल्याचे दिसत आहे. एक हेलिकॉप्टर उड्डाण करत होते आणि दुसरे लँडिंग करत असताना त्यांची टक्कर झाल्याचे समजते आहे.
दोनपैकी एक हेलिक़ॉप्टर क्रॅश झाले तर दुसरे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे समुद्र किनाऱ्यावर उतरविण्यात आले. हे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी एका हेलिकॉप्टरची विंडस्क्रीन काढून टाकण्यात आली. क्रॅश झालेले हेलिकॉप्टर उलट्य़ा बाजुने कोसळले होते.