अक्षरश: सात वर्षांच्या मुलीने नरकयातना सहन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वाट्याला छोट्याशा चुकीमुळे अमानुष छळ सहन करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन नातेवाईकांना अटक केली आहे. ही घटना राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील थानेटा या गावातील आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे. चिमुकलीच्या लहानश्या चुकीसाठी गरम सळईचे आणि सिगारेटचे चटकेही दिले जात होते. आरोपी नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या मुलीची नखंही उपटून काढली होती. पीडित मुलीच्या आईचं निधन झाल्यानंतर तिच्या वडीलांनी दुसरं लग्न केलं आहे. त्यानंतर तो गुजरातमधील सूरत याठिकाणी राहण्यासाठी गेला. त्याने आपल्या पोटच्या मुलीला नातेवाईकांकडे राहण्यास ठेवलं. संबंधित नातेवाईक या ७ वर्षांच्या निष्पाप मुलीकडून घरातील सर्व कामं करून घेत होती. यावेळी तिच्याकडून काहीही चूक झाली तर तिला कठोर शिक्षा दिली जात असे. स्थानिक पोलीस अधिकारी गजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पीडित मुलीवर अमानुष अत्याचार करणारे आरोपी दाम्पत्य किशन सिंह आणि त्याची पत्नी रेखा यांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला गरम सळईचे चटके, तिची नखं उपटली का? या अनुषंगाने आरोपी दाम्पत्याची चौकशी केली जात आहे.
आरोपी दाम्पत्य हे पीडित मुलीचे नातेवाईक आहेत. पीडित मुलीचे वडील सूरत येथे मजुरीचे काम करतात. त्यामुळे आपल्या मुलीची योग्य काळजी घेण्यासाठी वडीलांनी तिला गावातील नातेवाईकांकडे ठेवलं होतं. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा भावना पालीवाल यांनी सांगितलं की, या पीडित मुलीकडून घरातील सर्व कामं करून घेतली जात असतं. तिच्या छोट्या चुकांसाठी कठोर शिक्षा दिली जात असे. तिला अमानुषपणे मारहाण केली जात असे. तिला जेवण दिलं जात नसे. इतकेच नाही तर तिच्या गुप्तांगात मिरचीची पूड देखील जबदस्तीने टाकली होती. त्याचबरोबर तिला उलट टांगून मारहाण केली जात असे,' असे अनेक आरोप बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा भावना पालीवाल यांनी केले आहेत.
अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज
शुक्रवारी सकाळी मुलीला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेने (एनजीओ) गावात जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर तिच्याशी संवाद साधल्यानंतर चिमुकलीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित संस्थेने याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर देखील या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दाखल घेतली नाही. तिला पोलीस ठाण्यात ८ तास तसंच बसवून ठेवलं. मात्र वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या पीडित मुलगी बाल कल्याण संस्थेच्या ताब्यात आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत आणि भादंविच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दोन नातेवाईक पोलिसांच्या अटकेत आहेत.