लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परळ येथे दवाखाना असून तो विकण्याच्या बहाण्याने संपर्कात असलेल्या फेसबुकवरील महिला डॉक्टरच्या एका व्हिडीओ कॉलमुळे ८० वर्षीय ब्रोकर आजोबांचे खाते रिकामे झाले आहे. याच व्हिडीओच्या आधारे त्यांना धमकावत त्यांच्याकडून तब्बल ८ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी रविवारी फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
माटुंगा परिसरात ८० वर्षीय आजोबा कुटुंबीयांसोबत राहत असून रिअल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. ११ मार्चला त्यांची मानसी जैन नावाच्या महिलेची फेसबुकवर ओळख झाली. तिने ती डॉक्टर असल्याचे सांगून परळमधील दवाखाना विकण्यास मदत करण्यास सांगितले. मोबाईल क्रमांक शेअर करताच त्यांनी चौकशी करून कॉल करतो, असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर, महिलेने व्हिडीओ कॉल केला. मात्र, त्यात काही दिसले नाही आणि कॉल कट झाला.
त्यानंतर, दोन दिवसांनी महिलेने कॉल करून तुमचे अश्लील नग्न व्हिडीओ असून ते फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत दीड लाख रुपये उकळले. पुढे, पैशांची मागणी सुरूच असल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
सीबीआयमधून बोलतोय...
आजोबा जाळ्यात आल्याचे लक्षात येताच काही दिवसांनी सीबीआयमधून विक्रम राठोड म्हणून बोलत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ संबंधित व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड झाल्याचे सांगून ते डीलिट करण्याच्या नावाखाली तोतया यू ट्युब अधिकाऱ्याने पैसे उकळले. काही दिवसांनी जैन हिने आत्महत्या केल्याचा बनाव करत संपूर्ण प्रकरण बंद करण्यासाठी पैशांची मागणी करत एकूण ७ लाख ९७ हजार रुपये उकळले.