मुंबई : मी आयपीएस अधिकारी मिलिंद भारंबे बोलतोय... मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तुमच्या आधार कार्डाचा वापर झाला आहे. तुम्हाला प्रकरण मिटवायचे असेल तर २० लाख रुपये द्या.., असे सांगत सायबर भामट्यांनी एका ८१ वर्षीय वृद्धाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी मुंबईत घडली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, या भामट्यांनी आयपीएस अधिकारी मिलिंद भारंबे, पोलिस उपायुक्त प्रदीप सावंत आणि नीरज कुमार यांच्यासारख्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर फसवणुकीसाठी केला. सर्वप्रथम सचिन पाटील या नावाने या भामट्याने वृद्धाला फोन केला. आपण आयपीएस अधिकारी आहोत आणि मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तुमच्या आधार कार्डाचा वापर झाल्याचे आपल्याला समजले आहे. याच पैशांतून अमली पदार्थांची देखील खरेदी-विक्री झाली आहे. त्यामुळे तुम्ही गुन्हेगार आहात, असे सांगत या वृद्धाला त्याने भीती घातली.
या प्रकरणी तुम्हाला माझे वरिष्ठ पोलिस उपायुक्त प्रदीप सावंत यांच्याशी बोलावे लागेल, असे सांगत त्याने सावंत (तोतया अधिकारी) याच्याकडे फोन कॉल ट्रान्स्फर केला. त्याने देखील या वृद्धाला भीती दाखवत तुम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद भारंबे यांच्याशी बोलावे लागेल, असे सांगत भारंबे (तोतया अधिकारी) याच्याकडे फोन ट्रान्स्फर केला.
भारंबे यांच्या नावाचा वापर करत बोलणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याने या प्रकरणात तुम्ही निरपराध असल्याचे मला माहिती आहे. मात्र, थोडे पैसे दिले तर हे प्रकरण संपेल. असे सांगत त्याला २० लाख रुपये देण्यास सांगितले. भीतीपोटी या वृद्धाने ते पैसे दिले. मात्र, नंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. सायबर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.