नालासोपारा - हॅलो, वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे एक काश्मिरी दहशतवादी पेहरावातील तरुण फिरत असल्याचा फोन पालघर कंट्रोल रूमला आला आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात पोलिसांची एक तास फिल्मी स्टाईल धावपळ झाली. एका तासाने संशयित तरुण पोलिसांना भेटला आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. नालासोपारा पोलिसांनी या घटनेनंतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे लांब दाढी, रंग गोरा, आर्मीसारखे टीशर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला रुमाल, पोटावर मॅगझीन सारखे दिसणारे पॉकेट, हातावर आयसिसच्या झेंड्यामधील असलेले पान अश्या वेशभूषेतील दहशतवादी सारखा दिसणारा तरुण अंबाडी रोडवरील भारत बँकेचे सुरक्षा रक्षक अनिल रामदास महाजन यांनी पहिला आणि पालघर कंट्रोलमध्ये कळविले. त्याठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी आलेल्या फोनला गांभीर्याने घेत अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, माणिकपूर पोलीस ठाणे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, तिन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी, डीएसबी शाखा, सुरक्षा शाखा, वायरलेस, कोस्टगार्ड, कोळी व मच्छिमार सोसायट्या, एटीएस, सिमा शुल्क विभाग, बिट मार्शल, कस्टम या सर्वांना कळविले. सागर यांनी पंचवटीनाका येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही चेक केले. सीसीटिव्ही यंत्रणेत सदर संशयित तिन ठिकाणी दिसून आले व ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम एच 04 एफ के 2842) निष्पन्न झाली. त्यानंतर बिट मार्शल व स्थानिक पोलीसांना बस सनसिटी गास येथे सापडली. सदर ठिकाणी पोलिस पोहचले असता दहशतवादी वेशातील 20 ते 25 तरुण पोलिसांना आढळून आले. त्या सर्वांना माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले होते. चौकशीअंती बातमी सत्य होती परंतू शर्षक नसलेले हिंदी चित्रपटाचे ते चित्रीकरण ( शुटींग) करत असल्याची बाब निष्पन्न झाली व गास सनसिटी परिसरात नालासोपारा पोलिसांकडून शूटिंगसाठी परवानगी घेतली होती. आर्टिस्ट बलराम धुलाराम जितावल (23), आर्टिस्ट अरबाज रझ्झाक खान (20), हिमालय हृदयनाथ पाटील (27) आणि युनिट इंचार्ज दत्ताराम सखाराम लाड (38) यांच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना आली उपयोगालाअप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी वसई येथे पदभार स्वीकारल्यानंतर सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि प्रत्येक शहरात एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना अमालात आणली होती. या संकल्पनेनुसार मोक्याच्या ठिकाणी नागरिकांनी, दुकानदारांनी, इमारतीमधील राहिवाश्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. सोमवारी दहशतवादी आल्याची माहिती कंट्रोल रुमवरून मिळताच घटनास्थळी पोहचून पंचवटी नाका येथे संकल्पनेच्या माध्यमातून लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा प्रथम चेक केला आणि तो संशयित एका टुरिस्ट बसमध्ये चढताना व बस नंबर भेटला. या माहितीच्या आधारे एका तासाच्या आत फिल्मी स्टाईल धावपळ थांबली आणि तो तरुण सापडला. जर त्या तरुणाचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले नसते तर पोलीस प्रशासन, कस्टम विभाग, एटीएस सर्व अधिकारी कर्मचारी कामाला लागले असते. कोण आहेत अनिल रामदास महाजन?अनिल रामदास महाजन हे जम्मू काश्मीर येथे भारतीय सिमा सुरक्षा बलात 15 वर्षे नोकरी केली होती. सध्या ते सेवानिवृत्त असून भारत बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सीमेवर सुरक्षा करत असल्याने आयसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध त्यांना माहिती आहे. संशयित तरुणाच्या हातावर आयसिस संघटनेच्या झेंड्यामधील पान हे हातावर गोंदलेले असल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.