- नरेंद्र जावरेपरतवाडा (जि. अमरावती) : ‘हॅलो, नमस्कार. लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपयात मिळेल. पगारासाठी आवश्यक आहे. ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल, त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध कार्यालयांत वेतनासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. शासनाची वेबसाईट असली तरी त्याला चालविणारे आरोग्य विभागातील काही ऑपरेटर संगनमताने प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे ‘मोबाईल कॉलिंग’वर होणाऱ्या संभाषणामुळे पुढे आले आहे.
जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वेतनासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे प्रमाणपत्र दिल्यावरच वेतन काढण्याचे फर्मान कार्यालयप्रमुखांनी जारी केले आहे. याचाच फायदा उचलत पाचशे रुपयात कोरोना प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे पुढे आले आहे. फोनवर पाचशे रुपयांमध्ये कोरोना लसीचे प्रमाणपत्र देण्याचे संभाषण व्हायरल होत आहे.
कोरोना लसीकरण न करता प्रमाणपत्र विकत देणे व घेणे गंभीर बाब आहे. यासंदर्भात आरोग्य विभागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. असे कोणी आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.
‘स्वत:लाच धोका करून घेऊ नका’कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. असे प्रमाणपत्र कोणी देत असेल आणि घेत असेल, तर ते स्वतः, कुटुंब आणि देशासाठी धोकादायक आहेत. यासंदर्भात प्रशासनाला तात्काळ माहिती पुरवण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.