लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून ती प्रचंड घाबरली अन् तिने थेट आत्मघाताचाच निर्णय घेतला. लहान मुलांना घेऊन ती फुटाळा तलावावर पोहचली. आधी दोन मुलांना तिने तलावात ढकलले आणि नंतर स्वत:ही पाण्यात उडी घेतली. तलावावर असलेल्या अनेकांच्या काळजाचा ठोका या घटनेने चुकविला. ते नुसते बुडणाऱ्या मायलेकांना बघून ओरडू लागले. मात्र, दोन धाडसी तरुणांनी देवदूताची भूमिका वठविली. त्यांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्याचवेळी पोलीस उपायुक्त विनिता साहू तेथे पोहचल्या. मृत्यूच्या भीतीने अर्धबेशुद्धावस्थेत असलेल्या मुलीला त्यांनी धीर दिला. पोलिसांनी तिघांनाही गरम कपडे दिले अन् नंतर कुटुंबीयांच्या हवाली केले. अंगावर काटा आणणारी ही घटना गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास फुटाळा तलावावर घडली.सधन कुटुंबातील ही महिला गिट्टीखदानमध्ये राहते. तिचा पती शासकीय नोकरीत आहे. तिला ११ वर्षांचा मुलगा अन् ७ वर्षांची मुलगी आहे. तेसुद्धा चांगल्या शाळेत शिकतात. महिलेच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईकही राहतात. नात्यातीलच एका महिलेसोबत पीडित महिलेचा गुरुवारी रात्री वाद झाला. तो टोकाला पोहचला. तिने ‘येऊ दे तुझ्या पतीला, सांगतो त्याला’ असा दम दिला अन् ही प्रचंड दडपणात आली. नवरा आपल्याला मारेल, या भीतीने ती शहारली अन् दोन मुलांना घेऊन सरळ फुटाळा तलावावर पोहचली. दोघांनाही काठावर बसवत धक्का मारून तलावात लोटले. नंतर तिने स्वत:ही उडी घेतली. तलावावर असलेल्या अनेकांनी ही घटना बघून आरडाओरड सुरू केली. तेथे असलेल्या अमोल चकोले आणि अरविंद बघेल यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारली. त्यांनी दोन्ही मुल तसेच त्यांच्या आईला तलावाबाहेर काढले. एकाने ही माहिती नियंत्रण कक्षात कळविली. त्यामुळे वायरलेसच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनाही ती कळली. उपायुक्त साहूदेखील तेथे पोहोचल्या व आपल्या वाहनात बसवून गिट्टीखदान ठाण्यात नेले. तेथे तिच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांचे समुपदेशन करीत त्यांना त्यांच्या हवाली केले. भरल्या डोळ्यांनी लाख धन्यवाद देत त्या कुटुंबाने पोलीस ठाण्यातून निरोप घेतला.देवदूतांचा होणार सत्कारउपायुक्त साहू यांनी नंतर अमोल अन् अरविंदलाही ठाण्यात बोलावून घेतले. त्यांना धन्यवाद दिले. या दोघांचा आपण आपल्या कार्यालयात २६ जानेवारीला सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
तिचा आत्मघातकी निर्णय! अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:54 AM
क्षुल्लक कारणावरून ती प्रचंड घाबरली अन् तिने थेट आत्मघाताचाच निर्णय घेतला. लहान मुलांना घेऊन ती फुटाळा तलावावर पोहचली. आधी दोन मुलांना तिने तलावात ढकलले आणि नंतर स्वत:ही पाण्यात उडी घेतली.
ठळक मुद्देतरुणांनी दाखविली दिलेरी