मुंबई : काळबादेवीतील महिलेकड़ून ३ कोटी ८ लाख १० हजार रुपये किंमतीचे १ किलो २७ ग्रँम हेरॉईन जप्त करण्यात आले आहेत. सरस्वती परमा नायडू (५०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. नायडू गृहिणी असून, गेल्या दोन ते तीन वर्षापासून मुंबईतील मध्य आणि दक्षिण विभागात हेरॉईनची विक्री करत होती. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) वरळी पथकाने ही कारवाई केली आहे. तसेच तिला ड्रग्ज पुरवठा करणाऱ्याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, वरळी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक अशोक चांदे यांना गुरूवारी काळबादेवी परिसरात एक महिला हेरॉईन ची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरळी पथकाचे प्रभारी पोलीस निरिक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुदर्शन चव्हाण, विवेक खवळे, द्वारका पोटवड़े, अशोक चांदे यांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. तिच्या अंगझड़तीत १ किलो २७ ग्रँम हेरॉईन मिळून आले. आंतराष्ट्रीय बाजारात याची किंमत ३ कोटी ८ लाख आहे. नायडू ही दक्षिण आणि मध्य मुंबईत हेरॉईन या ड्रग्जची पुरवठा करणारी घाऊक विक्रेता असल्याचे सामोर आले. तिला ड्रग्ज पुरविणाऱ्या प्रमुख आरोपीचा शोध सुरु आहे. तिला ८ जूनपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे. तिच्याकड़े याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.