मडगाव - एका अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बाल न्यायालयाने दोषी ठरवून दक्षिण गोव्यातील विनेश फळदेसाई याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा पीठाने कायम केली. या अत्याचारात आरोपीला साथ देणाऱ्या त्या मुलीच्या आईला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मात्र कमी करताना ती 12 वर्षांवर आणली.
दहा वर्षापूर्वी ही नात्यांना काळीमा फासणारी घटना दक्षिण गोव्यात घडली होती. सदर अल्पवयीन मुलीच्या विधवा आईशी आरोपीचे अनैतिक संबंध होते. आरोपी तिच्या घरी येत असताना तिच्या अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचार करत असे. मुलीच्या आईला हे माहित असूनही तिच्याकडून त्याला विरोध झाला नव्हता. शेवटी त्या मुलीने आपल्या मामाच्या कानावर ही खबर घातल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनेश व त्या मुलीच्या आईला अटक करुन त्यांच्यावर बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
दहा वर्षापूर्वी त्या मुलीच्या वडिलाचे निधन झाले होते. त्यानंतर आरोपीचे तिच्या आईशी संबंध जुळले. त्यानंतर त्या मुलीच्याही नशिबी हे भोग आले. उच्च न्यायालयात सदर मुलीच्या आईच्यावतीने बाजू मांडताना तिच्या वकिलाने मुलीच्या आईला बाल कायद्यातील कलम 8(2) लागू होत नाही असा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायालयाने हा मुद्दा ग्राहय़ धरीत मुलीच्या आईची जन्मठेपेची शिक्षा रद्द करुन ती १२ वर्षांवर आणली. आतापर्यंत तिने 9 वर्षाचा कारावास भोगला आहे. त्यामुळे तिला आणखी तीन वर्षे कोठडीत काढावी लागणार आहेत.