हायकोर्ट : बलात्काराचा खटला निकाली काढण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:44 AM2020-01-11T00:44:45+5:302020-01-11T00:48:00+5:30
आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात आदेश जारी केला.
यापूर्वी विशेष सत्र न्यायालयाने या दोन प्रकरणांत वेगवेगळा खटला चालवून आरोपीला एका खटल्यात ५ ऑक्टोबर २०१७ रोजी भादंविच्या कलम ३७६(२)(आय) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड तर, दुसऱ्या खटल्यामध्ये ११ जानेवारी २०१८ रोजी भादंविच्या कलम ३७६(ई) (अत्याचाराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. विधी सेवा विभागाकडून पुरेसा अनुभव नसलेला व असक्षम वकील बाजू मांडण्यासाठी देण्यात आला. त्यामुळे योग्य बचाव करता आला नाही असा मुद्दा त्याने मांडला होता. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर २०१८ रोजी सत्र न्यायालयाचे निर्णय रद्द केले व या दोन्ही प्रकरणांवर दोषारोप निश्चितीच्या टप्प्यापासून नव्याने खटला चालविण्याचा आदेश दिला. त्यानंतर निर्धारित मुदतीत खटला निकाली निघू शकला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने अर्ज दाखल करून मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. ती विनंती मान्य करण्यात आली.