मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी दिले.
मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे.
या दाव्यावरील सुनावणीत वानखेडे यांचे वकील अर्शद शेख यांनी मलिक यांना पत्रकार परिषद न घेण्याचे व वानखेडे कुटुंबियांविरोधात काहीही वक्तव्य न करण्याचे अंतरिम आदेश द्यावेत, अशी मागणी न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे केली.
मात्र, नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी आपल्याला अशा काही सूचना नसल्याने अशी हमी देण्यास नकार दिला. जर मलिक ट्विटरवर उत्तर देऊ शकतात तर इथेही (न्यायालयात) उत्तर देऊ शकतात, असे न्या. जामदार यांनी म्हटले. न्या. जामदार यांनी मलिक यांना मंगळवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत १० नोव्हेंबर रोजी दाव्यावरील सुनावणी ठेवली.
ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला असून नाहक बदनामी करत असल्याबद्दल सव्वा कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. या प्रकरणाबाबत हल्ली रोज माध्यमांत नव नवे आरोप प्रत्यारोप होत आहेत असल्याचं हायकोर्टने सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. तसेच आम्हाला अद्याप नोटीस मिळालेली नाही"अशी माहिती नवाब मलिकांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. हे प्रकरण सुनावणीला येईपर्यंत नवाब मलिकांना वानखेडे कुटुंबियांबाबत कोणतंही विधान करण्यापासून मनाई करावी अशी मागणी ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टाकडे केली आहे.
दंडाधिकारी न्यायालयाने मालिकांना बजावली नोटीस
भाजपच्या युवा संघटनेचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांनी दाखल केलेल्या फौजदारी दाव्यावर दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली. नोटीस बजावताना न्यायालयाने म्हटले की, सकृतदर्शनी मलिक यांच्या वक्तव्यामुळे भारतीय यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ५०० अंतर्गत केस बनत आहे. एनसीबीने क्रूझवर छापा मारल्यावर मलिक यांनी भारतीय व त्यांच्या मेव्हण्याविरोधात काही विधाने केली. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचली.