मुंबईतील मद्यालयासाठीचा परवानासंदर्भात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र समीर वानखेडेंना अटकेपासून हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करणार न करण्याचे ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत.
ठाणे पोलिसांतील गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडेंनी केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीच्या मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई विभागाने ही फिर्याद दाखल केली आहे.
नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेलसाठी वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ते सज्ञान असल्याचे म्हटले होते. त्या जागेमध्ये कोणताही व्यवसाय केला नसल्यामुळे आयकर आणि विक्रीकर विवरणपत्र सादर केले नसल्याचेही म्हटले होते. ते सज्ञान असल्याबाबतची चुकीची माहिती दिली होती.